देशात 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जमिनीवर काम करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अभेद्य असलेल्या दक्षिण भारतासाठी भाजप कंबर कसून कामाला लागला आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपची दक्षिणेकडील राज्यांसाठीची रणनीती काय असेल? यासंदर्भात तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अण्णामलाई यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीतामिळनाडूतून निवडणूक लढवणार असल्याचे अण्णामलाई यांनी म्हटले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत के अण्णामलाई म्हणाले, "तामिळनाडूतील काही लोक नरेंद्र मोदी बाहेरील असल्याचे म्हणत प्रचार करत आहेत. मात्र, पीएम मोदींनी प्रादेशिक अडथळे पार केले आहेत आणि ते तामिळनाडूतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे." एवढेच नाही, तर 2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही एक वेगळ्या प्रकारची लोकसभा निवडणूक असेल, असेही अण्णामलाई यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूतून निवडणूक लढणार पीएम मोदी? -कोणता उमेदवार कुठून निवडणूक लढणार यासंदर्भात भाजपची स्वतःची एक विशेष प्रक्रिया आहे. भाजपचे संसदीय मंडळ कोणत्या जागेवर कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित करत असते. यापूर्वी, पंतप्रधान मोदी ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरतील अशी जबरदस्त चर्चा होती. पण संसदीय मंडळाने वाराणसी मतदारसंघच त्यांच्यासाठी सर्वात योग्य असल्याचे ठरवले.
के अण्णामलाई यांचे हे विधान खरे ठरल्यास पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडूतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे अनेक अर्थ निघू शकतात. दक्षिणेत काँग्रेसला मिळणारा जनतेचा वाढता पाठिंबा आणि तामिळनाडूत वेगळ्या द्रविणाडूची मागणी हे त्याचे सर्वात मोठे कारण असू शकते. तमिळनाडूबाबतच्या आतापर्यंतच्या सर्व योजनांमध्ये भाजप अपयशी ठरला आहे. मात्र, येत्या लोकसभा निवडणुकीत असे घडलेच, तर त्याचे उत्तर निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.