नवी दिल्ली: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. मात्र हरयाणातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. भाजपा, जेजेपीनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. दोन्ही पक्षांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असेल. तर जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल. हरयाणाच्या जनतेनं दिलेला जनादेश लक्षात घेऊन आम्ही (भाजपा-जेजेपी) सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं अमित शहांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं. 'दोन्ही पक्षात झालेल्या चर्चेतून आघाडीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्यमंत्री भाजपाचा, तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा असेल. उद्या आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करू,' असं अमित शहा म्हणाले.अमित शहांनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हरयाणात आम्ही जेजेपीसोबत सरकार स्थापन करणार आहोत. याआधीदेखील आम्ही एकमेकांना मदत केली आहे. यावेळी दुष्यंत चौटाला यांनी भाजपा आणि जेजेपी एकत्र येणं राज्यासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. राज्याला स्थिर सरकार देणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. याबद्दल मी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आभारी आहे. दोन्ही पक्ष स्थिर सरकार देऊन राज्याच्या प्रगतीसाठी काम करतील, असं चौटाला म्हणाले.