Haryana polls: हरियाणा विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि इतर प्रादेशिक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. बुधवारी अनेक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदारी अर्ज दाखल केले. दरम्यान, हरियाणाच्या महेंद्रगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
रामविलास शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर रामविलास शर्मा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यादरम्यान रामविलास शर्मा भावूक झाले आणि त्यांनी शपथ देत कार्यकर्त्यांना पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "मी तुम्हाला माझ्या ईमानदारीची शपथ देतो, मी रामाची शपथ घेतो, जर तुम्ही मला कमजोर केले, तर मी तुटून जाईन."
दरम्यान, रामविलास शर्मा यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) महेंद्रगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या जागेसाठी भाजपने उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपने काल रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यावेळी या जागेसाठी रामविलास शर्मा यांचे नाव यादीत नव्हते. त्यामुळे आता रामविलास शर्मा यांनी उमेदवारी मागे घेत निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
महेंद्रगड विधानसभा मतदारसंघातून भाजप रामविलास शर्मा यांना तिकीट देणार नाही, याची जाणीव त्यांना झाली होती, त्यामुळे त्यांनी पक्षाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, आता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माघार घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, जानेवारी २०१३ ते ऑक्टोबर २०१४ या काळात भाजपे प्रदेशाध्यक्ष असलेले रामविलास शर्मा दीर्घकाळ आमदार राहिले आहेत.
१९८२ ते २००० पर्यंत ते महेंद्रगड मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर २००० ते २०१४ पर्यंत काँग्रेसच्या राव दान सिंह यांनी त्यांचा पराभव करून आमदारकीची जागा काबीज केली. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले आणि भाजप सरकारमध्ये मंत्री झाले. तर २०१९ च्या निवडणुकीत राव दान सिंह यांच्याकडून त्यांचा पुन्हा पराभव झाला. यावेळी काँग्रेसने पुन्हा राव दान सिंह यांना तिकीट दिले आहे. तर महेंद्रगडमधून भाजपने कंवरसिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर या जागेवरून 'आप'ने मनीष यादव यांना तिकीट दिले आहे.