मणिपूर सरकार वाचवण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, नाराजांच्या मनधरणीसाठी दोन दिग्गज नेत्यांची पाठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:15 AM2020-06-22T11:15:42+5:302020-06-22T11:19:29+5:30
मणिपूरमधील राज्यसभेची एकमेव जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यातील सरकार वाचवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
इंफाळ - तीन आमदारांनी दिलेले राजीनामे आणि काही सहकारी आमदारांनी काढलेल्या पाठिंब्यामुळे मणिपूरमधील भाजपा सरकार अडचणीत सापडले आहे. दरम्यान, मणिपूरमधील राज्यसभेची एकमेव जागा जिंकल्यानंतर भाजपाने राज्यातील सरकार वाचवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सरकार वाचवण्यासाठी पूर्वोत्तर भारतातील भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे हेमंत बिस्वा शर्मा यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. हेमंत बिस्व शर्मा रविवारी रात्री मणिपूरची राजधानी इंफाळ येथे पोहोचले असून, त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे नेते कोनार्ड संगमा हे सुद्धा मणिपूरमध्ये पोहोचले आहेत.
भाजपा आणि एनपीपीमधील सूत्रांनी सांगितले की, हेमंत बिस्व शर्मा आणि कोनार्ड संगमा हे भाजपा आणि नॅशनल पीपल्स पार्टी च्या मणिपूरमधील शाखेत निर्माण झालेले मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करतील. या मतभेदांमुळे एनपीपीच्या चार आमदारांनी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या सरकारला असलेला पाठिंबा मागे घेतला होता.
दरम्यान, कोनार्ड संगमा यांच्यासाठी केवळ भाजपा हाच चिंतेचा विषय नाही आहे. तर आपल्या पक्षांतर्गत निर्माण झालेली परिस्थिती ही सुद्धा चिंतेची बाब आहे. आता इंफाळ दौऱ्यादरम्यान, पक्षाच्या मणिपूरमधील शाखेत निर्माण झालेल्या संकटाला नियंत्रित करता येईल, अशी कोर्नाड संगमा यांची अपेक्षा आहे.
हेमंत बिस्वा शर्मा आणि कोर्नाड संगमा यांनी आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन चर्चा केली आहे. एनपीपीच्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत पुर्नविचार करावा, असे आवाहन, कोर्नाड संगमा यांनी केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नेतृत्वबदलाशिवाय अन्य कुठल्याही बाबीवर तडजोड होणार नसल्याचे एनपीपीने भाजपा नेतृत्व आणि हेमंत बिस्व शर्मा यांना स्पष्टपणे सांगितले आहे.