नवी दिल्ली : आगामी वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अलीकडेच पाटणा येथे विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीत २० हून अधिक विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता भाजपने विरोधी पक्षांची एकजूट तोडण्याचा फॉर्म्युला शोधला असल्याचे म्हटले आहे. यासाठी भाजप विशेष रणनीतीवर काम करू शकते.
उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत. एका विशेष रणनीती अंतर्गत, भाजप देशभरातील सर्व ५४३ लोकसभा जागांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन झोन तयार करू शकते आणि त्या सर्वांचे वेगवेगळे प्रभारी असतील. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, त्यांना सरकार स्थापन करणे सोपे जाते, असे म्हटले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष एसबीएसपीसोबत हातमिळवणी करू शकतो. दोघेही जुने मित्र आहेत. याचा फायदा पूर्वांचलमध्ये भाजपला होऊ शकतो.
भाजप बिहारमध्ये मांझी, व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी आणि रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना आपल्यासोबत घेऊ शकते. दरम्यान, चिराग पासवान यांचे काका आधीच एलजेपी कोट्यातून एनडीएमध्ये मंत्री आहेत. अशाप्रकारे भाजप बिहारमध्ये नितीश-लालूंच्या विरोधात घेराव घालणार आहे. याचबरोबर, दक्षिणेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्याने आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत फारसे नुकसान होणार नाही, यासाठी देवेगौडांच्या पक्ष जेडीएसशी हातमिळवणी करू शकते. भाजप आणि जेडीएस एकत्र आल्यास कर्नाटकात त्यांचे मताधिक्य ५० टक्क्यांच्या जवळपास पोहोचू शकतो.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ताकदीसाठी भाजप चंद्राबाबू नायड यांच्या पक्ष टीडीपीसोबत येऊ शकतो. दोघांची यापूर्वी युती आहे. टीडीपीसोबत युती केल्यास आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात भाजपची ताकद वाढू शकते. भाजप पुन्हा एकदा आपला जुना भागीदार शिरोमणी अकाली दल (एसएडी) सोबत एकत्र येऊ शकतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये समझोता होण्याची शक्यता आहे, कारण भाजपला पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपच्या आव्हानावर मात करायची असेल तर अकालींचा पाठिंबा प्रभावी ठरू शकतो. तसेच, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि दक्षिणमधून भाजपला जास्त जागा मिळाल्या तर बहुमताचा २७२ चा आकडा पार करणे फारसे अवघड जाणार नाही.