लोकसभेपूर्वी दक्षिणेत BJP ची ताकद वाढली; केरळ जनपक्षम (सेक्युलर) पार्टी भाजपात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:44 PM2024-01-31T17:44:11+5:302024-01-31T17:45:08+5:30
केरळ जनपक्षम (सेक्युलर) पार्टीचे प्रमुख पीसी जॉर्ज यांनी आज आपला पक्ष भाजपात विलीन केला.
Kerala BJP (Marathi News): लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची दक्षिण भारतात ताकद वाढली आहे. केरळ राज्यातील केरळ जनपक्षम (सेक्युलर) पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे. पीसी जॉर्ज यांनी आज राजधानी दिल्लीत भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला, तसेच आपला पक्षही भाजपमध्ये विलीन केला आहे.
केरळमध्ये भाजपची ताकद वाढली
पीसी जॉर्ज भाजपमध्ये सामील झाल्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, "पीसी जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली केरळ जनपक्षम भाजपमध्ये विलीन झाल्यामुळे येत्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मोठे बळ मिळणार आहे." विशेष म्हणजे, पीसी जॉर्ज यांनी काही दिवसांपूर्वी पीएम मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. भारताला इतका कार्यक्षम पंतप्रधान कधीच मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
#WATCH | Seven-time Kerala MLA PC George's Kerala Janapaksham (Secular) merges with the BJP ahead of 2024 Lok Sabha Polls, in New Delhi pic.twitter.com/gsT39huyNc
— ANI (@ANI) January 31, 2024
कोण आहेत पीसी जॉर्ज?
पीसी जॉर्ज केरळच्या पुंजार विधानसभा मतदारसंघातून 30 वर्षांहून अधिक काळ आमदार होते. केरळ जनपक्षम (सेक्युलर) स्थापन करण्यापूर्वी ते केरळ काँग्रेस, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी), आणि केरळ काँग्रेस (सेक्युलर) यांसारख्या विविध राजकीय पक्षांशी संबंधित होते. 2011-2015 दरम्यान केरळमध्ये यूडीएफ सरकार सत्तेवर असताना जॉर्ज यांनी केरळ विधानसभेचे मुख्य व्हीप म्हणून काम केले होते. 2017 मध्ये त्यांनी केरळ जनपक्षम (सेक्युलर) पक्षाची स्थापना केली.