हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी ९ उमेदवारांची घोषणा केली. आतापर्यंत पक्षाने ४२४ उमेदवारांची घोषणा केली आहे. अद्याप पाच राज्यांमधील १९ मतदारसंघांसाठी नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
भाजप नेतृत्वाला या १९ जागांसाठी उमेदवार निवडण्यात जास्त वेळ लागत आहे. कारण, विरोधी पक्षांकडून या जागा हिसकावून घेण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या १९ जागांपैकी दोन उत्तर प्रदेशातील (रायबरेली आणि कैसरगंज), सहा जागा महाराष्ट्रात, सात जागा पंजाबमध्ये आणि प्रत्येकी एक जागा जम्मू -काश्मीर (पुंछ-राजौरी-अनंतनाग) आणि पश्चिम बंगाल (डायमंड हार्बर) या आहेत. भाजप ५४३ पैकी ४४३ ते ४४४ जागा लढवणार आहे आणि मित्रपक्षांसाठी जवळपास १०० जागा सोडणार आहे. दोन वेळा खासदार राहिलेले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिनिधित्व केलेली पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर जागा हिसकावून घेण्यासाठी भाजप नेतृत्व उत्सुक आहे.
प्रियांका गांधी यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावणारजम्मू- काश्मिरात भाजपने २ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत आणि ते अनंतनागमधून स्वतःचा उमेदवार उभा करू शकतात, तर इतर दोन जागा सोडू शकतात. रायबरेलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची भाजप वाट पाहत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद लावेल. कैसरगंजमध्ये भाजप कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी देऊ शकते.
महाराष्ट्रात काय?महाराष्ट्रात भाजपने २४ नावांची घोषणा केली आहे आणि आणखी सहा उमेदवार ते उभे करू शकतात. पंजाबमध्ये भाजपने सहा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित सात जागांसाठी पुढील आठवड्यात नावे जाहीर केली जातील.
अभिनेत्री किरण खेर यांचे तिकीट भाजपने कापले
नवी दिल्ली : भाजपने बुधवारी १०व्या यादीत नऊ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील ७, चंडीगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांना उत्तर प्रदेशच्या बलिया लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. येथून पक्षाचे खासदार असलेले वीरेंद्र सिंह मस्त यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले आहे. मंत्री जयवीर सिंह ठाकूर यांना विद्यमान खासदार डिंपल यादव यांच्या विरोधात उमेदवारी दिली. चंडीगडमधून दोनवेळा खासदार असलेल्या अभिनेत्री किरण खेर यांना पक्षाने उमेदवारी नाकारत, येथून नेते संजय टंडन यांना तिकीट दिले आहे.