भाजपाने आंध्र प्रदेशात काँग्रेसला दिला जबर धक्का, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी हाती घेतलं कमळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:58 PM2023-04-07T13:58:39+5:302023-04-07T13:59:33+5:30
Kiran Kumar Reddy Joins BJP: उत्तरेत पाया भक्कम केल्यानंतर भाजपाने दक्षिण भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, भाजपाने आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला जबर धक्का दिला आहे.
उत्तरेत पाया भक्कम केल्यानंतर भाजपाने दक्षिण भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, भाजपानेआंध्र प्रदेशमध्येकाँग्रेसला जबर धक्का दिला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते किरणकुमार रेड्डी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. किरण कुमार रेड्डी हे अखंड आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. किरण कुमार रेड्डी भाजपामध्ये आल्याने आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ अस्तित्व असलेल्या भाजपाला मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे.
या पक्षप्रवेशानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, किरण कुमार रेड्डी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य काँग्रेसमध्ये होते. काही काळापूर्वी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी ते पंतप्रधान मोदींच्या कार्यामुळे प्रभावित झाले असल्याचे सांगितले. अखेर आज ते भाजपामध्ये दाखल झाले. किरण कुमार रेड्डी हे भ्रष्टाचाराविरुद्धच्या आमच्या लढाईला आणखी भक्कम करतील, कारण एक आमदार आणि मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा स्वच्छ होती.
आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत किरण कुमार रेड्डी यांनी भाजपात प्रवेश केला. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
किरणकुमार रेड्डी हे २५ नोव्हेंबर २०१० ते १ मार्च २०१४ या काळामध्ये अविभाज्य आंध्र प्रदेशचे १६वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. तेलंगाणा राज्याच्या निर्मितीपूर्वी किरणकुमार रेड्डी हे अखंड आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री ठरले होते. किरणकुमार रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध केला होता. तसेच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. तसे जय समैक्य आंध्र या नावाचा वेगळा पक्षही स्थापन केला होता. मात्र नंतर ते काँग्रेसमध्ये परतले होते.