वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर, तेज बहादूर यांनी भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मोदींविरोधात निवडणूक न लढण्यासाठी मला भाजपाच्या नेत्यांकडून 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून पंतप्रधान मोदींनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला. तसेच माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे असून मी निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले होते. मात्र, आता तेज बहादूर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
भाजपाच्या नेत्यांनी माझ्यावर निवडणूक न लढविण्यासाठी मोठा दबाव टाकला होता. विशेष म्हणजे मला 50 कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप तेज बहादूर यांनी केला आहे. याप्रकरणी ऑफर देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करण्याचे यादव यांना विचारले असता, ते खूप घातक लोकं आहेत. मी जर त्यांचं नाव जाहीर केलं, तर मला ठार मारण्यात येईल, असे यादव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. माझा अर्ज बाद होईल, अशी अखिलेख यादव यांना पूर्वीपासूनच शंका होती. त्यामुळेच शालिनी यादव यांचेही नाव माझ्यासोबत सपाकडून उमेदवारीसाठी जोडले होते.
दरम्यान, शालीनी यादव यांच्याकडून राखी बांधत बहिणीच्या विजयासाठी मी बाजी लावणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. मोदींविरोधात आता समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालीनी यादव यांचा प्रचार तेज बहादूर यादव करणार आहेत.