राहुल गांधींशी चर्चेसाठी भाजपने दिले युवा कार्यकर्त्याचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 08:18 AM2024-05-14T08:18:19+5:302024-05-14T08:19:07+5:30
तेजस्वी सूर्या यांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा देशाला पाहता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांना राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करायची नाही. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे रायबरेलीचे कार्यकर्ते अभिनव प्रकाश पासी यांना चर्चेसाठी पाठवणार असल्याची चर्चा आहे.
राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. मात्र, अद्याप या निमंत्रणावर पंतप्रधानांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना थेट चर्चेसाठी वारंवार आव्हान दिल्याच्या प्रत्युत्तरात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींना पत्र लिहून रायबरेलीचे युवा मोर्चा कार्यकर्ता अभिनव प्रकाश पासी यांना चर्चेसाठी पाठवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीत पासी समाजाची लोकसंख्या ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. दुसरीकडे, तेजस्वी सूर्या यांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.