बंगळुरू - आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विरोधी पक्षाच्या गटाने इंडिया आघाडीची स्थापना केली असून पक्षाकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मोदींच्या नेतृत्त्वात राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यात एनडीएची बैठक झाली होती. या बैठकीला जवळपास ३६ राजकीय पक्ष भाजपाच्या नेतृत्त्वात एकत्र आले होते. मात्र, त्यापैकी अनेक पक्षांचा एकही खासदार किंवा आमदार नव्हता. तरीही मित्रपक्ष जोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. आता, दक्षिण भारतातून भाजपला एका पक्षाची सोबत मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
दक्षिण भारतात भाजपला अद्याप यश मिळवता आले नाही. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव झाला. त्यामुळे, दक्षिण भारतातून लोकसभेच्या अधिक जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी, भाजपाने आता जेडीएस (जनता दल सेक्युलर) पक्षाला सोबत घेतलं आहे. जेडीएसप्रमुख एच.डी. देवेगौडा यांनी भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. त्यानुसार, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपण भाजपासोबत असल्याचं देवेगौडा यांनी जाहीर केलं. त्यामुळे, भाजपाला कर्नाटकातून आणखी बळ मिळालं आहे.
रविवारी बंगळुरू येथील एका कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना येदियुरप्पा यांनी यासंदर्भात घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुका जेडीएस आणि भाजपा एकत्र लढवणार आहे. त्यासाठी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. जेडीएस लोकसभेच्या किती जागा लढवणार, याबाबत पक्षाचे नेते एच.डी. कुमारस्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असेही देवेगौडा यांनी म्हटलं.
प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्ष हे सेक्युलर स्वत:ला मोठे सेल्युलर म्हणतात. पण, इंडिया आघाडीच्या बैठकीला कुठल्याही पक्षाकडून निमंत्रण आलं नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे इंडिया आघाडीला लक्ष्य केलं. दरम्यान, आगामी राजकीय डावपेच असण्याचा एक भाग म्हणूनच ही युती झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
येदियुरप्पांकडून स्वागत
दरम्यान. देवेगौडा हे आमच्यासोबत येत असून ४ जागांवर त्यांनी युतीत येण्याचं मान्य केल्याचा मला आनंद आहे. मी त्यांचं पक्षात स्वागत करतो, असे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी म्हटलं आहे.