नवी दिल्ली : आठ राज्यांमधील विधानसभांच्या १२ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशच्या सत्तारूढ समाजवादी पार्टीला जबर हादरा बसला असून, तीनपैकी एकाच जागेवर सपाचा उमेदवार विजयी झाला आहे. या पोटनिवडणुकांत भाजप आणि मित्र पक्षांना सात जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. कर्नाटकातील तीनपैकी दोन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने तिथे काँग्रेसला धक्का बसला आहे.मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मैहर येथे भाजपचे नारायण त्रिपाठी विजयी झाले. आधी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. भाजपने कर्नाटकमधील तीन पैकी दोन जागांवर कब्जा करून सत्तारूढ काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला. हेब्बळ आणि देवदुर्गवर भाजपने आपला झेंडा रोवला तर बीदरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. भाजपचा मित्र पक्ष शिरोमणी अकाली दलाने पंजाबमधील खडूर साहिब जागेवर तर शिवसेनेने महाराष्ट्राच्या पालघर जागेवर विजय मिळविला. तेलंगणमधील सत्तारूढ टीआरएसने नारायणखेड येथे तर त्रिपुरात सत्तारूढ माकपाने अमरपूर येथे विजय संपादन केला. बिहारच्या हरखाली मतदारसंघात रालोआ समर्थक राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उमेदवार सुधांशू शेखर विजयी झाले. याआधी ही जागा रालोसपाकडेच होती. गेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार वसंत कुशवाह यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. सुधांशू शेखर हे कुशवाह यांचे चिरंजीव आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)गेल्या १३ फेब्रुवारीला पार पडलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. हे निकाल सपासाठी निराशाजनक ठरले. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर सदर, सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद आणि फैजाबाद जिल्ह्यातील बिकापूर या तीन जागांच्या पोटनिवडणुकीत सपाला केवळ बिकापूरवर आपला कब्जा कायम राखण्यात यश आले.लोकांचा विकासाच्या राजकारणावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे विविध राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना मिळालेल्या विजयावरून दिसते. रालोआने प्रशंसनीय काम केले. भाजपचा विजय झालेला पाहून आनंद झाला. या विजयाबद्दल मतदारांचे आभार. सबका साथ, सबका विकास. -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टिष्ट्वट
पोटनिवडणुकीत भाजपला दिलासा
By admin | Published: February 17, 2016 2:59 AM