नवी दिल्ली: माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय भाजपानं घेतला आहे. महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ असलेल्या राजघाटाजवळ वाजपेयी यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्मृती स्थळावर वाजपेयी यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय भाजपानं घेतला आहे. याच ठिकाणी 17 ऑगस्टला वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. भाजपाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचं काम 15 सप्टेंबरपासून सुरू होईल. या समाधी स्थळाची उभारणी 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 25 डिसेंबरला वाजपेयी यांची 94 वी जयंती आहे. मात्र या भव्य स्मारकाचं बांधकाम पूर्ण करण्यास आणखी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या स्मारकाचं उद्घाटन येत्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी वाजपेयी यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात येईल. यानंतर तीनच महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. त्यामुळे याचा राजकीय फायदा भाजपाला मिळू शकतो. या स्मारकामुळे भाजपाला स्वत:चा राजघाट मिळेल. वाजपेयी यांनी त्यांच्या जीवनातील बराच कालावधी दिल्लीतील 6, कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी व्यतित केला. मात्र याठिकाणी वाजपेयींचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार नसल्यानं राष्ट्रीय स्मृती स्थळावरील त्यांची समाधी भाजपाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असेल. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहून वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय स्मृती स्थळावर येऊ शकतात. मोदी सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आमंत्रित केलं आहे. मात्र अद्याप अमेरिकेच्या प्रशासनानं हे आमंत्रण स्वीकारलेलं नाही.
वाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:चा राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:41 PM