तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर आता मिझोरममध्येही काँग्रेसला तगडा झटका बसला आहे. गेल्या 36 वर्षांपासून येथे मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचाच कब्जा होता. यावेळी नवा पक्ष असलेल्या जोरम पिपल्स मूव्हमेन्टने 40 पैकी 27 जागांवर विजय मिळवला आहे. एमएनएफला पराभूत केल्यानंतर, ZPM सरकार बनविण्यासाठी तयार आहे. तर येथे काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली आहे. भाजपलाही येथे केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, स्वतः मुख्यमंत्री जोरमथंगा यांनाही आपली जागा राखता आली नाही.
तीन वेळा मुख्यमंत्री झालेले जोरमथंगा हे आयझॉल पूर्व फर्स्ट जागेवरून निवडणुकीच्या मैदानात होते. जोरमथंगा यांनी राज्यपाल हरी बाबू कुंभमपती यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. तसेच, झेडपीएमचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले लालदुहोमा यांनी मोठा विजय मिळवला आहे. आयजॉलमध्ये झेडपीएमने सर्वच्या सर्व 10 ही जागांवर विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री तॉनलुइया यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या निवडणुकीत भाजपला साइहा आणि पलक जागांवर विजय मिळाला आहे. येथे जातीय अल्पसंख्यक समूदाय राहतो. या विजयाबरोबरच भाजपने या राज्यात आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. भाजपला 2018 च्या निवडणुकीत मिझोरममध्ये केवळ एक जागा मिळाली होती.
काँग्रेसला झटका -केंद्रात एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या एमएनएफचा पराभव झाला असला तरी, सर्वात मोठा झटका काँग्रेसला बसला आहे. राज्यात सत्तेत आणि विरोधी पक्ष म्हणून राहणाऱ्या काँग्रेसला आता केवळ एकच जाता जिंकता आली आहे. मात्र भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.