लखनऊ: भाजपा सरकार राम मंदिर उभारू शकत नाही, असे विधान शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केले आहे. केंद्रात आमची सत्ता असल्यामुळे आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाकडून सांगण्यात येते. परंतु, घटनेनुसार केंद्र सरकार हे निधर्मी आहे. परिणामी हे सरकार राम मंदिर, मशिद किंवा गुरुद्वारा उभारू शकत नाही. केवळ आमच्यासारखे रामभक्तच राम मंदिर बांधण्यास समर्थ आहेत, असे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी शंकराचार्यांनी आसाराम बापू व राम रहीम यांच्यासारख्या स्वयंघोषित धर्मगुरूंवरही टीका केली. भारतातील लोकांनी आसारामला मोठे केले. चमत्कारांवर विश्वास असणाऱ्या लोकांनी कोणालाही संत केले. ख्रिश्चन धर्मीयांमुळे हा पायंडा पडला. आम्ही लोकांच्या दु:खाचे निवारण करतो, असा प्रचार ख्रिश्चन धर्माच्या प्रसारकांकडून करण्यात आला. हीच गोष्ट आसाराम बापू आणि राम रहिम यांच्या पथ्यावर पडली, असे शंकराचार्यांनी सांगितले.
भाजपा राम मंदिर उभारू शकत नाही- शंकराचार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 10:49 AM