ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७- सोनिया गांधींच्या कन्या प्रियंका गांधी-वडेरा यांनी त्यांच्यावर वाजपेयी सरकारच्या काळात भाडं कमी करण्यासाठी सौदा केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दिल्लीतल्या त्या घरासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसारच भाडं भरत असल्याचं यावेळी प्रियंका गांधींनी सांगितलं. प्रियंका गांधी वाजपेयी सरकारच्या काळात भाडं कमी करण्यासाठी सौदेबाजी केल्याचं एका रिपोर्टमधून उघड झालं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, 2002मध्ये प्रियंका गांधींनी दिल्लीस्थित बंगल्याच्या भाड्याची रक्कम आवाक्याबाहेर असल्याचं सांगत 53,421 वरून ती 8,888 करून घेतली होती. त्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यावेळी वाजपेयींच्या काळातल्या भाजप सरकारनं निर्धारित केलेल्या रकमेनुसारच मी भाडं देत असल्याचं सांगत प्रियंका गांधींनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रियंका गांधींना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप(एसपीजी)ची सुरक्षा देण्यात आली होती. डिसेंबर 1996मध्ये त्यांना खासगी निवास व्यवस्था भाड्यानं घ्यायची होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना सरकारी निवासस्थान राहण्यासाठी देण्यात आले. प्रियंका गांधींनी 2002मध्ये सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, 53 हजार 421 रुपये भाडं खूपच जास्त होतं असल्यानं मी ते भरू शकत नाही. मात्र दुसरीकडे प्रियंका गांधी लोधी इस्टेटला असलेल्या घराचं भाडं 31 हजार रुपये भरत असल्याची माहिती समोर आली आहे.