ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २२ - उना येथे ‘गायींचे संरक्षण’ करणाऱ्यांकडून मारहाण करण्यात आलेल्या दलित तरुणांच्या कुटुंबियांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. केजरीवाल यांनी राजकोट येथे जाऊन रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी तरूणांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच जखमी तरूणांच्या तब्येतीची विचारपूसही केली.
' ऊनामधील अत्याचारग्रस्त दलितांना न्याय मिळायलाच हवा, आरोपींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी' अशी मागणी केजरीवाल यांनी यावेळी केली. तसेच ' याप्रकरणी पोलिस का कारवाई करत नाहीयेत? असा सवाल विचारत राज्यातील भाजप सरकार दलितविरोधी असल्यानेच कोणतीही कारवाई होत नाही' असा घणाघाती आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला.
दरम्यान गुरूवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही उना येथे जाऊन पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील गुजरातेतील सरकार आणि त्याच्या गरीबविरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवत हा संघर्ष दोन विचारसरणींतील आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पीडित तरूणांची भेट घेत सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
आणखी वाचा :
अहमदाबाद येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गायींचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. याप्रकरणी चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुजरातच्या अमरेली शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी दगडफेक झाली होती आणि चार दलितांनी विष प्राशन केले होते. विष प्राशन करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले. दगडफेकीत एक पोलीस कर्मचारीही मरण पावल्याचे सांगण्यात येते. बंद काळात काही ठिकाणी रस्ते अडविण्यात आले तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. बंदला बहुजन समाज पक्ष आणि जन संघर्ष मंचने तसेच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उदयपूर येथून पाठिंबा दिला होता.