काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात झाली असून काँग्रेसला २४ वर्षांनंतर बिगर- गांधी अध्यक्ष मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांच जाहीर सभेत बोलताना खर्गे यांनी मोदी सरकावर टीका केली. तसेच, भाजपला काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, पण त्यांनाही माहितीय, ते शक्य नाही. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही, असे म्हणत नवनियुक्त अध्यक्षांनी मोदी सरकारला आव्हानच दिले.
AICC मुख्यालय दिल्ली येथे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी विजयाचे प्रमाणपत्र दिले. अध्यक्ष बनल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात खर्गे यांनी पक्षात 50 टक्के पदं ही 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली. उदयपुर येथील अधिवेशनात पक्षाची 50% पदं 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना देण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करणार असल्याचं खर्गे यांनी म्हटलं.
आज माझ्यासाठी अतिशय भावूक क्षण आहे, एका सर्वसामान्य कार्यकर्त्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. खोटं आणि तिरस्काराचे बंधन काँग्रेस तोडेल. केवळ पक्षासाठी नाही, तर लोकशाही वाचविण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज असल्याचेही खर्गेंनी म्हटले.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गेंनी राजघाटमधील महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर जाऊनही त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर, AICC च्या मुख्य कार्यालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी पुष्पबुके देऊन स्वागत केले.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम काँग्रेस मुख्यालयात झाला. या वेळी कार्यक्रमात पक्षाच्या दीर्घकाळ अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी, वरच्या फळीतील नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे औपचारिकपणे काँग्रेसची जबाबदारी सोपवल्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना पक्षापुढील आव्हानांवर चर्चा केली आणि नवीन अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी खर्गे यांनी सोनिया गांधींच्या एका विधानाशी फारकत घेत, असं घडणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितले.