इम्फाळ : मणिपूरचे आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार सिंग यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सरकारकडून आपल्याला अंधारात ठेवून कामात सातत्याने हस्तक्षेप होत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पक्षाचे चार आमदार असून, त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यास तेथील भाजपचे सरकार अडचणीत येऊ शकेल. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर महिनाभरातच सिंग यांनी राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मणिपूरच्या आरोग्य संचालकांना निलंबित करताना मला विश्वासात घेण्यात आले नाही. हे निलंबन ज्या पद्धतीने करण्यात आले ते पाहता हा माझ्या कामातील थेट हस्तक्षेपच आहे.सिंग यांनी म्हटले की, मी माझ्या कामासाठी विशिष्ट दृष्टिकोन ठरविला होता. माझ्या कामात होत असलेला हस्तक्षेप पाहता मला मी ठरविलेल्या गोष्टी पूर्ण करता येणे शक्य दिसत नाही. त्यामुळे मी राजीनामा देण्याचे पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे सिंग यांच्या राजीनाम्याची प्रत शुक्रवारी मध्यरात्रीच माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आली होती. (वृत्तसंस्था)यांच्या मदतीनेच बनवले सरकारदेशातील पाच राज्यांत नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात मणिपूरचा समावेश होता. ६0 पैकी २८ जागा भाजपने जिंकल्या. अन्य काही पक्षांच्या आमदारांशी हातमिळवणी करून भाजपने एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखाली तेथे सरकार स्थापन केले आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे ते नेते असून, त्यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. सरकार स्थापन करताना भाजपाला या पक्षाची मदत घ्यावी लागली होती. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ओडिशातील भुवनेश्वर येथे गेले आहेत. त्यांच्या माघारी जयंतकुमार सिंग यांनी राजीनामास्त्र उपसल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मणिपुरातील भाजप सरकार अडचणीत
By admin | Published: April 16, 2017 12:25 AM