बेळगाव : देशाचा सर्वांगीण विकास कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य आहे. यासाठीच आमचे सरकार सर्वाधिक प्राधान्य कनेक्टिव्हिटीला देत आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठविलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली योजना लाभदायी आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. बेळगावात येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजना, प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १६,००० कोटी रुपयांचे अनुदान एकही पैसा इकडे तिकडे न होता थेट जमा झाले आहे. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते, तर १६ हजार कोटींतील १२ ते १३ हजार कोटी गायब झाले असते, परंतु आमच्या सरकारने एकेक पैसा शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.मोदी म्हणाले, भाजपाचे सरकार २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत, अथक बदल घडविले जात आहेत. देशाचा कृषी अर्थसंकल्प २०१४ मध्ये २५,००० कोटी रुपयांचा होता. जो यंदा १ लाख २५,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती गंभीर आणि क्रियाशील आहे हे स्पष्ट होते.
कर्नाटकमध्ये सध्या रेल्वेच्या ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा-बेळगाव-घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वेसेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल,असे ते म्हणाले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.
काँग्रेसवर टीकाखर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. काँग्रेसचे नेते हताश झाले आहेत, असे सांगून मोदीला केव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले असले, तरी जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे मोदी यांनी मिश्कीलपणे सांगितले.
स्टार्टअपची सुरुवात१०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून, याचा श्रीगणेशा बाबूराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला.