भाजप सरकार झोपेच्या मूडमध्ये; प्रियांका गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:38 AM2019-12-10T01:38:06+5:302019-12-10T06:09:45+5:30
नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांनी विकासात अडथळा आला आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत.
नवी दिल्ली : महागाईच्या मुद्यावर सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, याप्रकरणी सरकार झोपेच्या मूडमध्ये दिसत आहे. त्या म्हणाल्या की, अनेक ठिकाणी कांदा २०० रुपये किलो विक्री होत आहे, तर, पेट्रोलचे दर ७५ रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक झाले आहेत. ही महागाई भडकलेली असताना भाजप सरकार अद्यापही झोपेच्या मूडमध्ये दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर काँग्रेस सातत्याने सरकारवर टीका करीत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांनी विकासात अडथळा आला आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत.
श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ
मोदी सरकारने केवळ श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ केले, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. निधीअभावी मोदी सरकार शिक्षण बजेटमध्ये ३००० कोटी रुपयांची कपात करणार असल्याचे वृत्त येत आहे.या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी सरकारवर ही टीका केली आहे. त्यांनी हिंदीतून टष्ट्वीट केले आहे की, भाजप सरकारने आपल्या श्रीमंत मित्रांचे ५.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे.
आपल्या श्रीमंत मित्रांना सहा विमानतळे दिली आहेत; पण शिक्षण बजेटमध्ये ३००० कोटींची कपात होत आहे. मोठे लोक रसगुल्ला खात आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मीठ आणि रोटी मिळत आहे.