नवी दिल्ली - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. जनतेला स्वतःकडे आकर्षिक करत आमचा पक्ष कसा आणि किती चांगला आहे?, हे दाखवण्याचा जो-तो सध्या प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
पी. चिदंबरम म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार स्वतःकडे उपलब्ध असलेल्या निधीपेक्षा अधिक खर्च करत आहेत आणि अशा पद्धतीनं खर्च करुन मोदी सरकार पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भल्यामोठ्या बिलाची रक्कम मागे ठेऊन जाणार आहे.
पी. चिदंबरम यांनी असाही दावा केला की, आगामी निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार असल्याचे भाजपाला कळून चुकलंय. यामुळेच भाजपा अशा प्रकारे धोरण अवलंबताना दिसत आहे.
चिदंबरम यांनी असेही म्हटलंय की,''मी यापूर्वीही सांगितलं आहे की भाजपाकडून बहुतांश पाऊल ही अचानक उचलली जात आहेत, पण यासाठी पैसा कुठेय?. भाजपा सरकार स्वतःकडे असलेल्या निधीपेक्षा अधिक खर्च करणार आणि पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भारीभक्कम बिल मागे सोडून जाणार आहे''.