नवी दिल्ली - नुकत्याच अस्तित्वात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रणकंदन माजले आहे. या कायद्याविरोधात एकीकडे मोठमोठे मोर्चे निघत असताना दुसरीकडे या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून केला आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, ''भाजपाचे सरकार देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून करण्यात येत असलेले आंदोलन ज्या प्रकारे दाबत आहे ते पाहून काँग्रेस पक्ष चिंतीत झाल आहे. देशभरातील विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम आणि अन्य आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी भाजपा सरकारच्या फुटिरतावादी आणि लोकविरोधी धोरणांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन करत आहेत. लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा नागरिकांना हक्क आहे, लोकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ''हे सरकार विरोधकांच्या आवाजाची गळचेपी करण्यासाठी निर्दयतेने बलप्रयोग करत आहे. ही बाब लोकशाही व्यवस्थेमध्ये अस्वीकारार्ह आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध नोंदवतो. तसेच विद्यार्थी आणि जनतेच्या संघर्षामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असेल. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या हिंसाचाराचे सत्र आजही सुरू राहिले. त्यात काही आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बलप्रयोग करावा लागत आहे.