मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. यानंतर देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. विरोधक मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत देशभरात निषेध करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर बोचऱ्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. घोड्यांबरोबर गाढवांची शर्यत लावली जात असल्याचे ते म्हणाले. खरे तर, सोमवारी संसदेत प्रवेश करताना पत्रकारांनी त्यांना विरोधकांच्या निदर्शनासंदर्भात प्रश्न केला असता, हरदीप सिंग पुरी म्हणाले, कुठे प्रभू रामचंद्र आणि कुठे हे लोक...
राहुल गांधींसंदर्भात बोलताना पुरी म्हणाले, ते म्हणतात की मी सावरकर नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. आपल्याला माहीत आहे, सावरकरजींचे योगदान काय आहे? हे जसे काही घोड्यांसोबत गाढवाची शर्यत सुरू आहे, असे चालले आहे. एवढेच नाही, तर कायदा व्यवस्था, राजकारणात काय चातले आणि काय चालत नाही, यावर या लोकांनी गांभीर्याने आत्ममंथन करायला हवे. अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
जर लोकशाहीत न्यायालयाने काही निर्णय दिला असेल तर, त्यावर महाभारत करण्याची कारण काय आहे? असा सवालही पुरी यांनी केला. तत्पूर्वी, 'मोदी' आडणावावरून टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधी यांना गुजरातमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांचे संसदेतील सदस्यत्व गेले आहे. विरोधक याला षड्यंत्र आणि सत्तेचा दुरुपयोग म्हणत आहेत. याच बरोबर, राहुल गांधी यांनीही आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.