भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकांसाठी कायमच रणनिती आखली जाते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत भाजपमध्ये चाणक्यनिती करत अनेक संघटनात्मक व पक्षीय बदल घडवले जातात. सध्या भाजपाकडून मिशन लोकसभा आखण्यात आलं असून त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आलीय. तत्पूर्वी आता ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्याचाच, भाग म्हणून भाजपच्या केंद्रीय समितीने ४ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले असून नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपानेतेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि झारखंड राज्यात संघटनात्मक बदल केले आहेत. तेलंगणात भारतीय राष्ट्र समितीला टक्कर देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून येथे केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी केंद्रीयमंत्री डी. पुरंदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांना झारखंड राज्याची जबाबदारी दिली असून पंजाबमध्ये सुनिल जाखड यांच्याकडे पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य बनवले आहे. एप्रिल महिन्यातच ते भाजपमध्ये सहभागी झाले होते. तर, एटाला राजेंद्र यांना तेलंगणात भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात आल्याचे भाजपने अधिकृतपणे सांगितले आहे. तत्काळ प्रभावाने या नियुक्या लागू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ३ जुलै रोजी केंद्रीय मंत्रीपरिषदेची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि पार्टी संघटनेचे महामंत्री बी. एल. संतोष हे प्रामुख्याने सहभागी होते. यापूर्वीही या तीन नेत्यांनी २८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत चर्चा केली होती. त्यानंतर, पक्षाच्या संघटनेत राज्य पातळीवर हे ४ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.