जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप; भाजपाने सोडली पीडीपीची साथ; सरकार गेलं अल्पमतात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 02:31 PM2018-06-19T14:31:30+5:302018-06-19T15:04:23+5:30
मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
नवी दिल्ली - मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. भाजपाचे नेते राम माधव यांनी या आज दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे. रमजानच्या काळात राज्यात लागू केलेली शस्त्रसंधी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर भाजपा आणि पीडीपीमधील तणाव कमालीचा वाढला होता. दरम्यान, मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाने केली आहे.
We have taken a decision, it is untenable for BJP to continue in alliance with PDP in Jammu & Kashmir, hence we are withdrawing: Ram Madhav, BJP pic.twitter.com/NWsmr7Io9e
— ANI (@ANI) June 19, 2018
मंगळवारी भाजपाच्या कोअर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. रमझानच्या काळात राजझिंग कश्मीरचे संपादक शुजाद चौधरी यांची हत्या झाल्यानंतर भाजपा आणि पीडीपीमधील संबंध तणावपूर्ण झाले होते.
जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करताना राम माधव म्हणाले,"जनतेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपाने पीडीपीसोबत सरकार चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सद्यस्थितीत सरकारमध्ये राहणे अवघड झाले होते. राज्यात दहशतवाद वाढला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सहमती दर्शवल्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे."
राज्यात तीन वर्षे सरकार चालवल्यानंतर काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. पीडीपीने प्रत्येकवेळी आम्हाला अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. आपल्यावरील जबाबदारी निभावण्यात मेहबुबा मुफ्ती पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत, असेही राम माधव यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाने साथ सोडल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ
पीडीपी - २८
भाजपा - २५
काँग्रेस - १२
नॅशनल कॉन्फरन्स - १५