श्रीनिवास नागे
कलबुर्गी : भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे. खुद्द अमित शाह या मिशनवर लक्ष ठेवून आहेत.
‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?
काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार यांना अस्मान दाखवण्यासाठी शहा यांनी व्यूहरचना केली आहे. मात्र, दोघेही महावस्ताद निघाले असून, त्यांनी राज्यभर भाजपविरोधात प्रचार तोफा धडधडत ठेवल्या आहेत. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची पाठ टेकवायचीच, त्याचबरोबर प्रियांक खरगेंना पाडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्का द्यायचा यासाठीही भाजपने ‘फिल्डिंग’ लावली आहे. सिद्धरामय्यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री सोमय्या यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या कनकपू मतदारसंघात त्यांच्याच वक्कलिग समाजाच्या आर. अशोक यांना उतरविले आहे.
चितापुरातून प्रियांक खर्गेंच्या विरोधात माणिकरत्न राठोड यांना, तर हुबळी-धारवाड मध्यमधून शेट्टर यांच्या विरोधात महेश टेंगिनकाई यांना लांग बांधली आहे. अथणीत सवदींविरोधात महेश कुमठळ्ळी यांना मोठी ताकद दिली जात आहे.
स्पेशल प्लॅन ‘फाईव्ह बी’
nविधानसभेच्या ७२ जागा असलेल्या पाच जिल्ह्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यात बेंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारीया ‘बी’ अद्याक्षराच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
n२०१८ मध्ये या जिल्ह्यांत भाजपला केवळ ३० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने ३७ जागा खेचल्या होत्या, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने पाच जागांवर विजय मिळविला होता.
२०१८ मध्ये लागली ठेच
२०२३ मध्ये जपून पावले राजधानी बंगळुरूमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील ३२ जागा आहेत. २०१८ मध्ये त्यापैकी केवळ ११ जागा भाजपला मिळाल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १०, तर बागलकोट मधील सातपैकी पाच जागांवर भाजपला यश मिळाले होते. बिदरच्या सहापैकी केवळ एक, तर बल्लारीतील नऊपैकी कशाबशा तीन जागा पदरात पडल्या होत्या. त्यामुळे यंदा या पाच जिल्ह्यांत कोणतीही कसर राहू नये, अशी ताकीद शाह यांनी राज्यातील नेत्यांना दिली आहे.