भाजपाने दिली जनतेला महागाईची भयंकर भेट, प्रियांका गांधी यांनी केली सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 05:19 AM2020-11-03T05:19:48+5:302020-11-03T06:38:12+5:30
Priyanka Gandhi : ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : बिघडत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत रोजगारानंतर महागाई मोठा मुद्दा बनला आहे.
महागाईच्या प्रश्नावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘भाजपाकडून जनतेला दिवाळीची भेट : भयंकर महागाई. भाजपाची त्याच्या भांडवलदार मित्रांना दिवाळीची भेट : ६ विमानतळ, भांडवलदारांची सोबत, भांडवलदारांचा विकास”
प्रियंका गांधी यांच्या ट्वीटसोबत नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केले : “देशाच्या शेतकऱ्यांनी मागितली मंडई, पीएमनी दिली भयानक मंदी.’’
या दोन्ही नेत्यांनी टीका भाज्या, फळे, डाळी आदी दैनंदिन गरजांच्या वस्तुंचे भाव वाढल्यानंतर केली आहे. बाजार भावाबद्दल बोलायचे तर बटाटे व कांदे किलोला ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
कृषी मंत्रालयाचे आकडे सांगतात की, २०१८-२०१९ मध्ये बटाटे कोल्ड स्टोरेज भांडारमध्ये २३८ लाख टनांपेक्षा जास्त होता तो २०२० मध्ये २१४ लाख टनांवर आला. हिच परिस्थिती डाळी आणि दुसऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तुंची आहे.भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन.
ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत.
हीच परिस्थिती कमीअधिक डाळींची आहे. त्यांचे भाव १४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या १० वर्षांत यंदा प्रथमच बटाट्याचे भाव ५० ते ६० रूपये किलो झाले आहेत.
२०१९ मध्ये जो कांदा साधारण ४५ रुपये किलो होता तोच २०२० मध्ये ११० रुपये किलो विकला गेला. याचा अर्थ तो १४३ टक्के महाग झाला. आज उडिदाची डाळ १०६ रुपये किलो, तुरीची डाळ १०७ रुपये, मसूर डाळ ७८ रुपये किलो, मूग डाळ १०३ रुपये किलो मिळत आहे.