नवी दिल्ली: काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे, हे भाजपने लोकांच्या मनावर बिंबवले. आम्ही नेहमीच देवळांमध्ये जायचो. मी राजीव गांधींसोबत प्रवास करायचे तेव्हा आम्ही अनेक मोठ्या मंदिरांना भेट द्यायचो. मात्र, आम्ही या सगळ्याचा कधी दिखावा केला नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सोनिया गांधी शुक्रवारी 'इंडिया टुडे कॉनक्लेव्ह'च्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, 26 मे 2014 पूर्वी देश अंध:कारात बुडाला होता का? गेल्या चार वर्षांमध्येच भारताने प्रगती, समृद्धी आणि उत्तुंगता प्राप्त केली आहे का? त्यामुळे असा दावा करणे हा आपल्या देशातील आजपर्यंतच्या बुद्धीवंतांचा अपमान नाही का?, असे अनेक सवाल यावेळी सोनिया यांनी उपस्थित केले. सध्या न्याययंत्रणेत मोठा गोंधळ माजला आहे. व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा (आरटीआय) अस्तित्त्वात आला. मात्र, आता हा कायदा बासनात गुंडाळला गेला आहे. 'आधार'चा वापर घुसखोरीच्या साधनासारखा केला जात असल्याचा आरोप सोनिया यांनी केला. यावेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष सामान्यांशी संवाद राखण्यात अपयशी ठरल्याचीही कबुली दिली. आमच्या अनेक पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याचे नवीन तंत्र शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सोनिया गांधी यांनी सांगितले.
आम्हीही देवळात जातो, पण त्याचा दिखावा करत नाहीः सोनिया गांधींची भाजपला चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 12:43 PM