भाजपला २४०पेक्षा जास्त; तर काँग्रेसला १४०हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:08 AM2019-05-07T07:08:14+5:302019-05-07T07:08:42+5:30
लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत. २४० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा दावा भाजपच्या सूत्रांनी केला असून १४०हून जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास आहे.
दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयामध्ये त्या पक्षाची तर गुरुद्वारा रकबगंज मार्गावर काँग्रेसची वॉररुम आहे. भाजपच्या वॉररुममध्ये काम करणारे ५५ जण विविध मतदारसंघांतील मतदानाचे प्रमाण व अन्य बाबींचे अहोरात्र विश्लेषण करत आहेत. त्यातून भाजपला किती जागांवर विजय मिळेल याचा अंदाज बांधता जाईल. भाजपच्या वॉररुममधील लोक याआधी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने आता वॉररुममधील कामकाजावर अमित शहा लक्ष ठेवून आहेत. एनडीएतील घटक पक्ष लढवत असलेल्या जागांवर झालेले मतदान व तेथील स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी भाजपच्या वॉररुममध्ये स्वतंत्र विभाग आहे. रा. स्व. संघाच्या हजारो स्वयंसेवकांकडूनही माहिती मागविली जात आहे.
२०१४मध्ये भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत यापेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा भाजप करत असला तरी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये पक्षाला फटका बसेल अशी चर्चा त्या पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात आहे.
मात्र ही उणीव पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरयाणा या राज्यांत मिळू शकणाऱ्या यशामुळे भरून निघेल असे भाजपला वाटते.
महाराष्टÑात काँग्रेसला ११ ते १३ जागा ?
उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात प्रत्येकी ११ ते १३ जागा मिळतील असे काँग्रेसला वाटत आहे. राजस्थानमध्ये १५, मध्य प्रदेशमध्ये १४, छत्तीसगढमध्ये ८, पंजाबमध्ये ८ ते ९, आसाममध्ये ६ ते ७, गुजरातमध्ये ६ इतक्या जागांवर विजय मिळेल असा त्या पक्षाला विश्वास आहे.