नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचा आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे. तसेच मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीमुळे अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्थ व्यवस्थेला मजबूत आधार मिळाला आहे. तसेच जागतिक पातळीवर भारताची विश्वसार्हता वाढल्याचे पात्रा यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, मनमोहन सिंग माजी पंतप्रधान असून वयाने मोठे आहेत. परंतु, त्यांच्या १० वर्षांच्या कालखंडात भारताची ज्या प्रमाणात प्रगती व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही. मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते, परंतु, ज्या लोकांनी त्यांना पडद्यामागून निर्देश दिले ते लोक भ्रष्टाचारात अलिप्त होते. त्या लोकांमुळे घराणेशाहीला वाव मिळाला आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले.
दरम्यान मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळाला असून जगात आपल्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतीक पातळीवर पाचव्या स्थानी पोहोचली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल, असा दावा पात्रा यांनी केला.
चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.