नवी दिल्ली - केंद्रातील भाजप सरकारने मुलगी वाचवाऐवजी गुन्हेगार वाचवा हे धोरण का राबवले असा सवाल करत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उत्सव साजरा केला जात असताना खर्गे यांनी बुधवारी भाजपला लक्ष्य केले. या योजनेच्या निधीतला ८० टक्के पैसा हा जाहिरातींवर खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षांनी एक्स या सोशल माध्यमाद्वारे सरकारला तीन प्रश्न विचारले. मुलगी वाचवाऐवजी भाजपने गुन्हेगार वाचवा ही योजना का सुरू केली. मणिपूरच्या महिलांना कधी न्याय मिळणार. हाथरसची मागासवर्गीय मुलगी असो, उन्नावमधील लेक किंवा आमच्या महिला पहेलवान, या प्रकरणात भाजपने नेहमी गुन्हेगारांचे संरक्षण का केले.