नवी दिल्ली : अमेरिकेत शिखांविषयी मी केलेल्या वक्तव्याचा भाजप विपर्यास करत आहे. माझा आवाज दडपण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. शिखांविषयी अमेरिकेत केलेली विधाने राहुल गांधी यांनी मागे घ्यावीत, अशी मागणी भाजपने केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला निर्भयपणे आपल्या धर्माचे पालन करता आले पाहिजे, असे देशात वातावरण हवे, असे मी म्हटले होते. यात काय चूक आहे, हे शीख बांधवांनी मला सांगावे. माझ्या वक्तव्याबाबत भाजप खोट्यानाट्या गोष्टी पसरवत आहे. भारतामधील एकता, समानता आदी मूल्यांबद्दल मी नेहमीच बोलत राहणार. राहुल गांधी यांनी शिखांबद्दल अमेरिकेत केलेली विधाने मागे घ्यावीत, अशी मागणी भाजपने केली.
राहुल यांच्यावरील खटल्याची सुनावणी १ ऑक्टोबरला
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथे खासदार-आमदार न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. बार असोसिएशनने दिवाणी न्यायालयाच्या आवारात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात वकील व्यग्र असल्याने शनिवारी न्यायालयीन कामकाज होऊ शकणार नव्हते. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
भाजप, संघाविरोधात काँग्रेस निदर्शने करणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या भाजप, रा. स्व. संघ यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष निदर्शने करणार आहे, असे त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जम्मू येथे शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
राहुल यांच्या विरोधात भाजपकडून तक्रार दाखल
राहुल गांधी यांनी अमेरिकेत अनुसूचित जाती-जमाती इतर मागासवर्गीयांबाबत वादग्रस्त उद्गार काढल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने एकता यांना धोका निर्माण झाल्याचा दावा भाजपने केला आहे.
भाजप नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी शिखांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत शिखांच्या संघटनांच्या संस्थांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. यावेळी शीख बांधवांनी राहुल गांधी यांचा निषेध केला.