- संजय शर्मा
नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या विरोधकांच्या ऐक्यावर टीका करताना भाजपने म्हटले आहे की, ते स्वत:ला वाचवण्यात गुंतले आहेत. पाटण्यात उद्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिला असून, त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या ऐक्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे.
मोदी सरकारमधील एका केंद्रीय मंत्र्याने म्हटले आहे की, - कही की ईट कही का रोडा, भानुमती ने कुनबा जोडा- या धर्तीवर आघाडी तयार होत आहे. जे नेते आपसात एकजूट होऊ शकले नाहीत ते विरोधकांच्या ऐक्याच्या गोष्टी करीत आहेत. विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजप काय करणार, असे विचारल्यावर त्यांनी म्हटले आहे की, भाजपला काही करण्याची गरज नाही. आता ते स्वत:च हे काम करतील. त्यांचा २०२४मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, हे कोणीतरी त्यांना विचारायला पाहिजे.
सर्व एकता भंग पावेलउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसबरोबर मिळून सपाने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. त्याने काय झाले? सपा व बसप दोहोंनी मिळून निवडणूक लढवली होती, त्याचा काय परिणाम झाला? देश बदलला आहे, जनतेला मोदींसारखा नेता मिळाला आहे. विरोधकांना कोण विचारतोय? कर्नाटकमध्ये पराभूत झालेल्या भाजपचे महाराष्ट्र व बिहारसारख्या राज्यांत काय होणार, असे विचारले असता, महाराष्ट्र असो की बिहार असो लोकसभा निवडणुकीत जनता वेगळ्या पद्धतीने मते देत असते. देशाची जनता देशाचा पंतप्रधान निवडते. मोदींच्या जवळपासही कोणी दिसत नाही.विरोधकांच्या एकजूट लढण्याने काय होईल, असे विचारले असता सरकारमधील वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यांतच पाहून घेतले जाईल.