पाटणा - बिहारमध्ये मुकेश सहानी यांचा पक्ष फोडल्यानंतर आता पक्षाची नजर काँग्रेसवर आहे. बिहारमधील काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. १९ पैकी १३ पेक्षा अधिक आमदार भाजपामध्ये येतील. लवकरच बिहार काँग्रेसमध्ये पळापळ होणार असून, बिहारमध्ये भाजपाच्या आमदारांची संख्या ९०च्या पुढे जाईल, असा दावा बिहारमधील भाजपा आमदार आणि फायर ब्रँड नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपा नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांचा दावा बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या सदस्यांचे नेते अजित शर्मा यांनी खोडून काढला आहे. बिहार काँग्रेसमधील सर्व आमदार एकजूट आहेत. कुठलाही आमदार फुटणार नाही, भाजपा नेते चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करत असतात. दरम्यान, व्हीआयपीचे तीन आमदार भाजपात दाखल झाल्याने विधानसभेमध्ये भाजपा ७७ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आता काँग्रेसच्या आमदारांना तोडण्याचा भाजपा प्रयत्न करेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अशा परिस्थितीत बचौल यांनी हे विधान करून त्या शक्यतांना बळ दिले आहे. भाजपा बिहारमध्ये आपल्या आमदारांची संख्या का वाढवत आहे? जातीय जनगणना, बिहारला विशेष राज्याचा दर्जा, मद्यविक्रीवरील बंदी, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांमधील वाद, यामुळे भाजपा आणि जदयू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यातच व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहानी यांच्या आमदारांना भाजपाने फोडल्यानंतर जेडीयूने सहानींचे समर्थन केले. त्यामुळेही भाजपा नाराज आहे. आमदारांची संख्या वाढवून भाजपा काही वेगळा खेळ खेळणार आहे का, की त्यामाध्यमातून नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, २०१७ च्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या ६० जागा घटल्या आहेत. आता राष्ट्रपती निवडणूक जवळ येत आहे. त्यात प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेही भाजपा अधिकाधिक आमदारांना आपल्याकडे ओढून आपलं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज आहे.