नवी दिल्ली : नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळत भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष पुन्हा एकदा एकत्र सत्तेत आला आहे. दरम्यान, ईशान्येकडील निवडणुका संपल्यानंतर भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश राजकीय पक्ष सक्रिय दिसत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आत्तापासूनच मोठ-मोठ्या व्यासपीठावरून आगामी लोकसभा निवडणुकीकडे इशारा करताना दिसून येत आहेत. यातच आता सत्ताधारी भाजपने 2024 च्या निवडणुकीची ब्ल्यू प्रिंट तयार केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, सध्याची तयारी पाहता 2024 च्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजप पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसते.
भाजपचे सर्वात मोठे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 2024 च्या निवडणुकीसाठी 100 रॅली घेणार आहेत आणि डिसेंबर 2023 पर्यंत या रॅली पूर्ण करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रॅलींद्वारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील विशेषत: 160 मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय, अनेक मोठे प्रकल्पही जाहीर केले जाणार आहेत. तसेच, या रॅलींद्वारे महिला आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यावर भाजपचा भर असणार आहे.
या राज्यांवर विशेष लक्ष असेल आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करेल, म्हणजेच भाजप तिसऱ्यांदा केंद्रात आपले सरकार स्थापन करेल. सध्या भाजप दक्षिणेकडील राज्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा घेता येईल. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजप 2024 च्या निवडणुकीसाठी तामिळनाडू आणि केरळवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच, भाजपची महिला मोर्चा शाखा देशातील महिलांपर्यंत पोहोचणार आहे.