नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन पेगॅसस आणि शेतकरी कायद्यांवरून गाजत आहे. विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली आहे. त्यामुळे अनेकदा सभागृहांचं कामकाज स्थगित करावं लागत आहे. यानंतर आता सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोडमध्ये आला आहे. भाजपनं त्यांच्या राज्यसभेतील खासदारांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे. १० आणि ११ ऑगस्टला सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना व्हिपच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
पावसाळी अधिवेशनाचा बराचसा कालावधी गोंधळात गेला आहे. विरोधकांची घोषणाबाजी आणि त्यानंतर तहकूब होणारं कामकाज यामुळे बहुतांश विधेयक चर्चा न करताच मंजूर झाली. यानंतर आता काही महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत पारित करून घ्यायची असल्यानं सरकारनं तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच भाजपच्या राज्यसभेतील खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठीदेखील भाजपनं व्हिप बजावला आहे. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल.
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण विधेयकाची जोरदार चर्चा आहे. ही विधेयक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. हे विधेयक आज मांडलं जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (एनडीए) पारडं जड आहे. मात्र तरीही कोणताही धोका पत्करण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळेच पक्षाकडून आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला गेला आहे. त्यामुळे राज्यसभेत आज आणि उद्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.