नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७० वा वाढदिवस असून, त्यादिवशी त्यांना किमान दहा लाख लोकांनी सेल्फी व्हिडिओ चित्रित करून शुभेच्छा द्याव्यात यासाठी भाजपने मोहीम हाती घेतली आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार तसेच स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे.भाजपच्या आयटी विभागाने या उपक्रमाची आखणी केली आहे. त्यासाठी ‘हॅपी बर्थडे मोदीजी’ हा हॅशटॅग तयार केला आहे. केवळ नागरिकांनीच शुभेच्छा देणे अपेक्षित नाही तर मोदी यांनी भारतामध्ये कसा बदल घडविला त्याचे चित्र उमटावे या पद्धतीने सदर उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.देशातील विविध जाती, धर्म, पंथाचे तसेच वेगवेगळ््या प्रदेशांचे लोक मोदी यांना वाढदिवसाच्या या हॅशटॅगवर शुभेच्छा देताना दिसावेत, अशी भाजप आयटी विभागाची अपेक्षा आहे.मोदींविषयी आदरभाव बाळगणारे करोडो लोक भारतात तसेच विदेशातही आहेत. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. मात्र, समाजमाध्यमांवर मोदींना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हॅशटॅग सुरू करण्याची कल्पना भाजपतर्फे राबविली जात आहे, या आरोपाचा मात्र या नेत्याने इन्कार केला.उत्स्फूर्तपणे जनतेकडूनच सारे प्रयत्न- मोदींना आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याची पूर्वकल्पना नाही, असाही दावा या नेत्याने केला. हे सारे प्रयत्न जनतेकडूनच उत्स्फूर्तपणे सुरू आहेत, असेही त्याने सांगितले.- या मोहिमेबाबत भाजपच्या आयटी विभागाने संबंधित लोकांना व्हॉटस्अॅपवर दूरध्वनी करून माहिती दिली आहे. आपण ही मोहीम आखली आहे, याचा कोणताही डिजिटल पुरावा उपलब्ध होऊ नये याची काळजी भाजपचा आयटी विभाग घेत आहे.
१० लाख जण देणार सेल्फी व्हिडिओद्वारे शुभेच्छा!, नरेंद्र मोदींच्या वाढदिवसासाठी भाजप आयटी विभागाची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 4:07 AM