हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांवर साऱ्या देशाचे लक्ष आहे. तेथील चार लोकसभा जागांच्या निवडणुकांबरोबरच सहा विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकालही येत्या ४ जून रोजी लागणार आहेत. हिमाचलमधील सुखविंदरसिंह सुक्खू सरकार सत्तेवर राहील की नाही हे विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांवरून ठरणार आहे. या सर्व घडामोडींबद्दल लोकमत हिंदी व्हिडीओचे संपादक प्रशांतकुमार झा यांनी सुक्खू यांची घेतलेली ही मुलाखत.
प्रश्न - ४ जून रोजी आपल्या सरकारची पहिली परीक्षा आहे. लोकसभेच्या चार जागा, विधानसभेच्या ६ जागांच्या पोटनिवडणुका यापैकी कोणती परीक्षा अधिक अवघड आहे.
सुखविंदरसिंह सुक्खू - राजकारणात असलेल्या लोकांना नेहमी परीक्षेला सामोरे जावे लागते. निवडणुकांचे लागणारे निकाल ही काही माझी पहिली परीक्षा नाही, काहीवेळा जिंकलो, काही वेळा हारलोदेखील. लोकसभा व विधानसभेत आम्ही उत्तम लढत देणार आहोत. मात्र या निवडणुकांचा निकाल काय असेल हे अखेर जनताच ठरविणार आहे. हिमाचल प्रदेशच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे. जो पक्ष जनतेच्या भावनांशी खेळतो त्याला मतदार योग्य तो धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाहीत.
प्रश्न - सर्वांत जास्त दडपण लोकसभेचे की विधानसभेचे?
सुक्खू - दहाही जागा जिंकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामध्ये चार लोकसभेच्या व ६ विधानसभेच्या जागा आहेत. आमच्या सरकारला काही धोका आहे म्हणून हिमाचल प्रदेशमधील जनतेला मी हे आवाहन करतोय असे कोणीही कृपया समजू नये. जे सहा लोक विकले गेले आहेत, ते जनतेच्या न्यायालयात आता उभे आहेत. घोडेबाजाराचे हे राजकारण बंद झाले पाहिजे.
प्रश्न - निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तुम्ही भाजपचा भ्रष्टाचार, धनशक्ती याबद्दल आवाज उठविला आहे. कोणता भ्रष्टाचार जनतेसमोर मांडत आहात?
सुक्खू - हिमाचल प्रदेशमध्ये एक वर्षांपूर्वी ४० आमदार निवडून आले. नंतर राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी सहा आमदारांनी आमच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. माझ्या कामाविषयी नाराजी होती तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकांनंतर विधानसभेत यायला हवे होेते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घ्यायला हवा होता. त्याऐवजी ते हरयाणात पंचकुला येथील एका हॉटेलमध्ये जाऊन राहिले. हरयाणात भाजपचे सरकार आहे. दुसऱ्या दिवशी ते हेलिकॉप्टरमधून परत आले. सोबत सीआरपीएफचे जवान होते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, ते अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत का आले नाहीत? याचा अर्थ त्यांचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू होते.
प्रश्न - राज्यसभेच्या निवडणुकांत विरोधात मतदान करणारे सहा आमदार आता भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारले होते. त्यांनी पक्ष व निवडणूक चिन्ह बदलले असले, तरी जनता त्यांना पुन्हा निवडून देईल, असे तुम्हाला वाटते का?
सुक्खू - हिमाचल प्रदेशमधील सहाही विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे हे सहाही उमेदवार चौदा महिन्यांपूर्वी हात या चिन्हावर निवडून आले होते. आता तेच कमळ निशाणी घेऊन लोकांकडे मते मागणार आहेत. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात? असा प्रश्न आता जनता या सहाही जणांना विचारणार आहेत. कोणत्याही प्रकारे आणखी आमदारांना खरेदी करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळविण्याचे काही लोकांचे प्रयत्न होते. काँग्रेसच्या विचारधारेतून भारतातील लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्या मताधिकाराचीच जर कोणी आमदार विक्री करत असेल तर ती लोकशाहीची हत्या आहे.
प्रश्न : भाजप सातत्याने घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत आहे. तुम्ही कायम राजेशाहीविरोधात, एका राजघराण्याविरोधात लढा दिला आहे. २०२१ साली वीरभद्र यांचे निधन झाले. त्यानंतर तुमचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. भाजपच्या विचारसरणीशी तुमची संघर्षगाथा जुळते असे वाटत नाही का?
सुक्खू - भाजप घराणेशाहीविरोधात बोलत असला तरी स्वत: त्या गोष्टी पाळत नाही. आता भाजपचे अनुराग ठाकूर यांचेच उदाहरण घ्या. ते प्रेमकुमार धुमल यांचे पुत्र आहेत. माझा कोणालाही वैयक्तिक विरोध नाही. मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून काम करतो. विविध मुद्द्यांवर कधी कधी कधीकधी संघर्ष होतो. मात्र बहुमताने जो निर्णय होतो तो सर्व जण मान्य करतो.
प्रश्न : काँग्रेसने राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार घातला, असा प्रचार भाजप करत आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीच अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला होता हे वास्तव आहे. असे असूनही हिमाचल प्रदेशात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तुम्ही एक दिवसाची रजा जाहीर केली. असे केेले नसते तर राज्यात स्थान डळमळीत झाले असते, असे वाटत होते का?
सुक्खू - राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी भाजप सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. मात्र हिमाचल प्रदेश सरकारने संपूर्ण एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. आता या गोष्टीवरून राजकीय स्वार्थ साधण्याचा सुरू असलेला प्रकार चुकीचा आहे. भगवान राम, अयोध्या ही आमची श्रद्धास्थाने आहेत. भाजपने राममंदिर, प्राणप्रतिष्ठा अशा मुद्द्यांवरून राजकीय फायदा उपटण्याचा प्रयत्न करू नये.
प्रश्न - आपल्या राजकीय जीवनात तुम्ही राजेशाही प्रवृत्तीचा कायम विरोध केला. त्यामुळेच आता आपण मुख्यमंत्री बनल्यानंतर लोक तुमच्याविरोधात उभे ठाकले आहेत का?
सुक्खू - राजकारणात सध्या काही तत्त्वे उरलेली नाहीत असे आजकाल सर्रास म्हटले जाते. मात्र तुमची स्वत:ची काही तत्त्वे असतात. मी काही पहिल्यांदाच आमदार बनलेलो नाही. गेल्या २०-२२ वर्षांपासून मी आमदार म्हणून निवडून येत आहे. त्याआधी मी शिमला नगर निगममध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. आपल्याला आदर्श वाटणाऱ्या गोष्टींवर नेहमी कायम राहावे. तो मार्ग कठीण असतो पण निर्धार पक्का असेल तर वाटचाल करणे सोपे होते.
(लोकमत हिंदीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहा सविस्तर मुलाखत)