लखनऊ:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी घटनेवरून योगी सरकार आणि मोदी सरकारविरोधात अद्यापही विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी अटक न झाल्याने शेतकरी नेते आक्रमक झाले असून, देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यातच आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सूचक आणि महत्त्वाचे विधान केले असून, कायद्यासमोर सर्व समान आहे, दोषी आढळल्यास कारवाई होईलच, असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला शुक्रवारी क्राइम ब्रांच समोर उपस्थित राहायचे होते. मात्र, तो उपस्थित झाला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. योगी आणि मोदी सरकारसह भाजपवरही निशाणा साधला जात आहे. यावरून एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दोषी आढळल्यास निश्चित कारवाई
कायद्यासमोर सर्वच जण सारखे आहेत. कायद्याच्या वर कुणीही नाही. दोषी आढळल्यावर कारवाई निश्चित होईल, असे नड्डा यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ही घटना दुर्दैवी असून, यातील दोषींना पाठिशी घातले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेनंतर आतापर्यंत योगी सरकारने एकालाही अटक केलेली नाही. यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शेतकरी नेत्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.