नवी दिल्ली - अनेक दिवस चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर भाजपा आणि जेडीयूने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. या आघाडीच्या घोषणेमुळे बिहारमध्ये एनडीएचे पारडे भक्कम झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपाध्यक्षअमित शाह यांनी शुक्रवारी राजधानी नवी दिल्लीत या आघाडीची घोषणा केली.
\बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि जेडीयू बिहारमध्ये प्रत्येकी १७ जागांवर निवडणूक लढवतील. तर रामविलास पासवान यांच्या एलजेपी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएसपीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी होऊन जागावाटप झालेले बिहार हे पहिले राज्य आहे. २०१४ साली भाजपा, एलजेपी आणि आरएलएसपी या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र आता आघाडीमध्ये जेडीयूसुद्धा सहभागी झाल्याने या पक्षांना काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. पैकी गेल्यावेळी २९ जागा लढवणाऱ्या भाजपाने आपल्या वाट्याच्या १२ जागा जेडीयूला दिल्या आहेत. २०१४ साली भाजपाने एकूण २२ जागांवर विजय मिळवला होता.देशातील बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यात जेडीयूला यश आले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाविरोधात भूमिका घेणाऱ्या जेडीयूला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, जागावाटपाबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. येत्या काही दिवसांत जागावाटपाला अंतिम रूप दिले जाईल असे अमित शाह यंनी सांगितल्याची माहिती आरएलएसपीचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी दिली.