पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्व पक्षांकडून तयारी सुरू आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी घटकपक्षांसोबत आघाडी करण्यात सरुवात केली आहे. दरम्यान, भाजपसोबत युती करण्यावरून जनता दल (सेक्युलर) मध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कर्नाटक जेडीएस प्रमुख सीएम इब्राहिम म्हणाले की, केवळ त्यांच्यासोबत असलेले लोकच खरे आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) जेडीएसचा समावेश होणार नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेशी सीएम इब्राहिम यांनी संवाद साधला. यावेळी. "आमच्यासोबत येणारे येऊ शकतात. ज्यांना जायचे आहे, ते जाऊ शकतात. आम्ही पाहू की, कोणाजवळ किती आमदार जातात. मी कर्नाटक जेडीएसचा अध्यक्ष आहे. मी भाजपसोबत युती करणार नाही. अशा स्थितीत विरोधी आघाडी म्हणजे 'इंडिया' आणि एनडीए आहे. आम्ही त्यांच्याशी (इंडिया) चर्चा करू", असे सीएम इब्राहिम म्हणाले.
याचबरोबर, जेडीएस आणि भाजपची युती आम्हाला मान्य नाही. कारण आम्हीच खरा पक्ष आहोत, असे सीएम इब्राहिम म्हणाले. दरम्यान, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना तुम्ही निर्णय कसे घेऊ शकता अशा प्रश्न विचारल्यावर सीएम इब्राहिम म्हणाले, "त्यांच्याकडे (एचडी देवेगौडा) तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ नाही. किमान माझ्याकडे कर्नाटक आहे. अशा स्थितीत ते राष्ट्रीय अध्यक्ष कसे असतील? एचडी देवेगौडा हे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि एचडी कुमारस्वामी हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत. त्यामुळे अशा स्थितीत मी म्हणतो परत या."
दरम्यान, नुकतेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जेडीएस आणि भाजपने युती केली होती. गेल्या २२ सप्टेंबर रोजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर जेपी नड्डा यांनी बैठकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, जेडीएसचे एनडीएमध्ये स्वागत आहे.