दिल्लीत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेसशी हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:51 PM2019-06-13T13:51:20+5:302019-06-13T13:52:07+5:30
काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरी देखील 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही.
नवी दिल्ली - एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने राजधानी दिल्लीत महानगर पालिका निवडणुकीत चक्क हातमिळवणी केली आहे. दिल्ली महानगर पालिकेच्या उत्तर विभागात आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. तर संख्याबळ असूनही 'आप'च्या पदरी निराशा आली आहे.
नॉर्थ एमसीडी अर्थात दिल्ली महानगर पालिकेमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. यामध्ये सीमा ताहिरा अध्यक्ष तर सुलक्षणा उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ९ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसकडे केवळ ६ नगरसेवकांची मते होती. काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरी देखील 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची चाल
भारतीय जनता पक्षाची नजर महानगर पालिकेपेक्षा या महानगर पालिकेत येणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघांवर आहे. यामध्ये चांदणी चौक, मटिया महल, सदर बाजार आणि बल्लीमारान या मतदार संघांचा समावेश आहे. या मुस्लीमबहुल मतदार संघात भाजप काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपला ठावूक आहे की, मुस्लीमबहुल भागात काँग्रेस मजबूत झाल्यास, आपची मते विभागली जातील. त्याचा सर्वाधिक लाभ भाजपलाच होणार आहे.