हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजप राज्यांमधील आपल्या मित्रपक्षांसोबत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करीत आहे. बिहारमध्ये एलजेपी (आर)चे नेते चिराग पासवान यांच्याशी चर्चेची अंतिम फेरी झाल्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लगेच ओडिशाबाबत सल्लामसलत केली. भाजप आणि बिजू जनता दलाने एकत्र निवडणुका लढविण्याचे मान्य केले असून, जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपीला सहा जागांपैकी सिंहाचा वाटा दिला जाईल आणि त्यांचे काका पशुपती पारस यांना राज्यपालपदाची जबाबदारी किंवा लोकसभेची जागा दिली जाऊ शकते. त्यांच्या पक्षाला एक जागा दिली जाऊ शकते; पण, ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. चिराग पासवान यांचे त्यांच्या काकांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचा अहवाल भाजपला बिहारमधून मिळाला आहे. एलजेपी आणि आरएलजेपी हे दोघेही बिहारमध्ये एनडीएचे सहकारी आहेत. जनता दल (यू) नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत लोकसभेच्या जागावाटपाचा मुद्दा भाजपला अद्याप सोडविता आलेला नाही.
जर या निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्या तर नितीशकुमार हे लोकसभेच्या काही जागा सोडण्यास तयार आहेत. नितीशकुमार यांनी त्यांच्या कोट्यातून उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाला लोकसभेच्या जागा द्याव्यात. विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी आणि जीतन राम मांझी यांना लोकसभेच्या जागा मिळणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. बिहारमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.