बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. याच दरम्यान, बुधवारी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, चिराग पासवान यांच्यासोबतचे संसदेतील फोटो का व्हायरल होतात? य़ावर ती हात जोडून जोरजोरात हसायला लागली. चिराग आपला चांगला मित्र असल्याचं तिने सांगितलं.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली की, "संसदेला तरी सोडा... हे संविधानाचं मंदिर आहे. मी तिथे माझ्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते. चिराग आणि मी एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो. तो माझा खूप चांगला मित्र आहे. पण आता चिरागही रस्ता बदलून जातो." हे सर्व सांगताना कंगना जोरजोरात हसत होती.
कंगना राणौतला राहुल यांची तुलना इंदिरा गांधींसोबत करण्याबाबत विचारण्यात आलं होतं. यावर ती म्हणाली की, "हा विनोद आहे. राहुल गांधी यांच्याकडे कोणतंही व्हिजन नाही. त्यांच्याकडे स्वतः चा कोणताही मार्ग नाही. त्यांच्या वागण्यातही ते असेच आहेत आणि त्यांच्या भाषणातही अशीच गडबड दिसून येते."
"इंदिरा गांधी या देशाच्या तीनदा पंतप्रधान झाल्या आहेत. काही लोकांना वाटतं की, इंदिरा गांधी या फक्त राहुल गांधींच्या आजी होत्या. पण मला तसं वाटत नाही. इंदिरा गांधींना फक्त राहुल गांधींची आजी म्हणणं हे त्यांच्या कारकर्दीला सीमित करतं. त्या संपूर्ण देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या आपल्या इतिहासाचा एक भाग होत्या. त्यामुळे आपलाही त्यांच्यावर तितकाच हक्क आहे" असंही कंगना राणौतने म्हटलं आहे.