हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना राणौत अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. कंगना खासदार झाल्यापासून सातत्याने आपल्या भागाचे आणि राज्याचे प्रश्न मांडत आहे. संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत मंडीची परिस्थिती सुधारण्यासाठी ती सातत्याने आपली बाजू मांडत आहे. याच दरम्यान भाजपा खासदाराने मंडी क्षेत्राबद्दल असं काही म्हटलं जे समजल्यावर सर्वजण तिचं कौतुक करतील.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौतला विचारण्यात आलं होतं की, जर तुमच्याकडे कोणती सुपर पॉवर असेल तर तुम्हाला काय बदलायचं आहे? याला उत्तर देताना कंगना म्हणाली, "मला माझ्या मतदारसंघातील पूरजन्य परिस्थिती बदलायला आवडेल. ती दरवर्षी येत असते आणि त्यामुळे खूप विध्वंस होत असतो. पूर थांबवण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करू इच्छिते. आमच्याकडे योग्य प्रमाणात पाऊस पडतो पण कृपया पूर थांबवा, आणखी पूर येऊ नके. मंडीमध्ये पूर आला होता, त्यामुळे मोठं नुकसान झालं."
हिमाचल प्रदेशात, ऑगस्टच्या सुरुवातीला अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. मंडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंगनाने पूरग्रस्तांची भेट घेतली होती. ती पीडितांना मिठी मारून सांत्वन करतानाही दिसली. कंगना रणौतने भेटीदरम्यान सांगितलं होतं की, येथे एक हृदयद्रावक शोकांतिका पाहिली आहे. लोकांनी मुलांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून त्यांना धक्का बसला आहे. हिमाचल सरकारने पीडित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
पूर आणि पावसामुळे हिमाचल प्रदेश आणि मंडीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. अजूनही अनेक ठिकाणी भूस्खलन होत असून त्यामुळे रस्ते बंद आहेत. सध्या हिमाचलमधील ४० रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. मंडीमध्ये दरड कोसळल्याने १२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. कांगडामध्ये १०, कुल्लूमध्ये ९, शिमल्यात ५ आणि उना, सिरमौर, चंबा आणि लाहौल-स्पितीमध्ये प्रत्येकी एक रस्ता बंद आहे.