नवी दिल्ली - दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत दिलेली धडक तसेच अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्याने या आंदोलनावर टीका होऊ लागली आहे. प्रजासत्ताक दिनप्रसंगी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. याच दरम्यान भाजपाने तिरंगा रॅलीची घोषणा केली आहे.
भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीमध्ये विशेष तिरंगा रॅली काढण्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. आमचा तिरंगा आमचा सन्मान, आमचे पोलीस आमचा अभिमान. तिरंगा रॅली 30 जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून ही रॅली सुरू होईल. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये नक्की सहभागी व्हा" असं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ट्रॅक्टर रॅलीमधील हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय
आज सिंधू बॉर्डरवर शेतकरी नेते गोळा झाले. तसेच कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेतला. कृषी कायदे मागे घेईपर्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ठिकठिकाणी शेतकरी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दिवसभर झालेल्या हिंसाचारात सुमारे 300 हून अधिक पोलीस जखमी झाले. दरम्यान, आज सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेते जमा झाले. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करून शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी नेत्यांनी यावेळी सांगितले की, हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे. काल आंदोलनात हिंसाचार करणाऱ्यांशी आमचे काहीही देणेघेणे नाही. दीप सिद्धू आणि काही लोकांनी शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम केले. काही शेतकरी नेत्यांनी आंदोलनाला काळीमा फासण्याचे काम केले आहे. दीप सिद्धू हा सरकारचा माणूस आहे. हे लोक लाल किल्ल्यापर्यंत कसे पोहोचले, पोलिसांनी त्यांना का जाऊ दिले हे जाणून घेण्याची गरज आहे, असा आरोपही शेतकरी नेत्यांनी केला.