नवी दिल्ली - कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते के एस ईश्वरप्पा यांनी विधानसभेत बोलताना एक मोठं विधान केलं आहे. देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन भविष्यात आरएसएससोबत जोडले जातील असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांना तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला आरएसएसला ‘आपली आरएसएस’ म्हणून मान्यता द्यावी लागेल असं म्हटलं. यावर काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर नेते के एस ईश्वरप्पा यांनी हे विधान केलं.
काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांनी भाजपाच्या काही नेते आणि मंत्र्यांसोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख केला. "आपण कोणत्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो यापेक्षा एकमेकांचा आदर करणं जास्त महत्वाचं आहे. आधी आपले वैयक्तिक संबंध येतात आणि नंतर पक्षांमधील मतभेद…भाजपा, आरएसएस, काँग्रेस आणि इतर" असं सिद्धरमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी अध्यक्षांनी सिद्धरमय्या यांना तुम्हाला आरएसएसची भीती का वाटत आहे? असं विचारलं.
सिद्धरमय्या उत्तर देत असताना काँग्रेस आमदार जमीर अहमद उभे राहिले आणि आक्षेप घेत अध्यक्षांना विचारलं की, तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसले असताना 'आपली आरएसएस' म्हणत आहात? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "हो नक्कीच ही आपली आरएसएस’ आहे, अजून काय बोलणार? आता किंवा कधीतरी तुम्हाला ही आपली आसएसएस असं म्हणावंच लागणार आहे". तर काँग्रेस आमदारांनी तो दिवस येणार नाही असं म्हटलं.
भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये यावरून जोरदार वाद झाला. यानंतर ईश्वरप्पा उभे राहिले आणि म्हणाले की, "या देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन आज किंवा भविष्यात कधी ना कधी आरएसएससोबत जोडले जातील, यामध्ये काही शंका नाही." त्यांच्या या विधानावर काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.