मुंबई - महाराष्ट्रातील भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह (BJP Kripashankar Singh) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती केली आहे. मात्र यामुळे आता नवा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे वळवण्याचा एक प्रयत्न कृपाशंकर सिंह आणि भाजपाकडून करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची विनंती केली आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते. या संदर्भातील सूचना योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन आहे. वाराणसीत प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशातून अनेक तरुण-तरुणी दरवर्षी महाराष्ट्रात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी येत असतात. मात्र, मराठी भाषेमुळे त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. तसेच कृपाशंकर सिंह यांनी केलेली सूचना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.