नवी दिल्ली :ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचे सोडून ममता बॅनर्जींमुळेपश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
ममता दीदी पश्चिम बंगालच्या जनतेला आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळू देत नाही. कारण ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव आणून पश्चिम बंगालमधील जनतेला या योजनेचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिले.
कागदी घोडे नाचवून काही फायदा नाही
ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक कागद पाठवला होता. त्यात पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान योजना लागू करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून काही फायदा नाही. बंगाली जनतेला मुर्ख बनवण्याचे काम ममता बॅनर्जी करत आहेत. केवळ एका कागदाने काही होत नाही. त्यासोबत शेतकऱ्यांची यादी पाठवायला हवी. बँक खात्यांचा तपशील हवा. यापैकी काहीच पाठवले नाही, असा दावा शाह यांनी केला.
घुसखोरांना ममता दीदींची फूस
ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या भूमिला रक्तरंजित केले. बंगालमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांची फूस असल्याचा घणाघात शाह यांनी केला. या घुसखोरांना पश्चिम बंगालचे नुकसान करू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच याला रोखू शकते, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
ममता बॅनर्जी एकट्या पडणार
विधानसभा निवडणुकाची चाहूल लागताच तृणमूल काँग्रेसमधील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. निवडणूक निकालानंतरही हे चित्र असेच राहील. शेवटी ममता बॅनर्जी एकट्या पडतील, असा दावा शाह यांनी केला. डाव्या पक्षांची साथ सोडून ममता बॅनर्जी यांनी दहा वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. 'माटी माटी मानुष' असा नाराही देत पश्चिम बंगालचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन दिले. मग असे काय घडले की, आता मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला भगदाड पडत आहे, अशी विचारणाही अमित शाह यांनी यावेळी केली.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची कालावधी जवळ येत चालला आहे, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. अलीकडेच तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला.